हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला हैदराबाद सारखे काहीतरी करा- प्रणिती शिंदे
Praniti Shinde (File Photo)

हिंगणघाट येथील शिक्षिकेला पेटवून दिल्याच्या घटनेविरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी वर्ध्यासह संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या जळीत हत्याकांडाप्रकरणी अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहे. सिनेस्टार्सपासून राजकीय नेत्यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी संताप व्यक्त करत 'हिंगणघाट आरोपीला हैदराबाद सारखी शिक्षा व्हावी' अशी मागणी केली आहे.

हिंगणघाटच्या जळीत हत्याकांडानंतर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. त्यावेळी प्रणिती शिंदे आपला रोष व्यक्त करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

'या घटनेचा मी निषेध करते. पीडित तरुणीची प्रकृती लवकर सुधारेल, अशी प्रार्थना मी करते. कायदे वगैरे असून सुद्धा या नराधम लोकांची मानसिकता कधी बदलेल, माहीत नाही. मुलींची छेडछाड करणाऱ्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे. प्रशासन व घरच्यानी पीडितेला पाठिंबा दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे. तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  वर्धा: हिंगणघाट प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक

हिंगणघाटातील आरोपी जागेवरच पकडला गेला आहे त्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. या खटल्याचा निकाल 90 दिवसांच्या आत लागला पाहिजे नाहीतर हैदराबाद सारखे काही तरी करा असंही त्या म्हणाल्या.

हैदराबाद येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून टाकणारे नराधम पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले होते. गुन्हा घडला त्याच ठिकाणी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले होते. ही चकमक बनावट असल्याचे आरोपही त्यानंतर झाले होते.