दिशा सॅलियन (Disha Salian Case) प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर केला आहे. दिशा सालियन प्रकरणात राणे-पितापुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी म्हटले की, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल. त्या त्या ठिकाणी अन्यायनिवारणासाठी आम्ही बोलत राहू, आवाज उठवत राहू.
नितेश राणे यांनी या वेळी म्हटले की, सध्या संजय पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांना महाविकासआघाडी सरकारने दिलेल्या यादीनुसार ते काम करत आहेत. विरोधी पक्षातील कोणाकोणावर कारवाई करायची आणि त्यांना कोणकोणत्या गुन्ह्यात अडकवायचे याबाबत ही यादी आहे. त्यांना केवळ यादी पाहून टीकमार्क करायची एवढेच काम आहे. असे असले तरी आम्ही घाबरणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही अन्यायाविरोधात आवाज उठवत राहू, असेही नितेश राणे म्हणाले. (हेही वाचा, Disha Salian Death Case:अमित शाह यांचा फोन? नारायण राणे यांनी चक्क खोटा दावा केला? पोलिसांनी न्यायालयात काय म्हटले पाहा)
दिशा सालियन हिच्या मृत्यू पश्चात नारायण राणे आणि त्याचे पुत्र नितेश राणे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, राणे यांनी केलेल्या आरोपावरुन दिशा सालियान हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन झाल्याचा दावा करत नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दिशाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणीत मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राण चौकशी साठी बोलावले होते.