Dhananjay Munde Replies to Pankaja & Pritam Munde: कोरोना लसींवरुन पंकजा आणि प्रितम मुंडे यांनी केलेल्या टीकेला धनंजय मुंडे यांचे सडेतोड उत्तर
Dhananjay Munde | (Photo Credit-Facebook)

बीड (Beed) मध्ये कोविड19 लसीचा (Covid-19 Vaccines) तुटवडा निर्माण झाला असून केंद्रातून राज्यासाठी आलेल्या 2 लाख लसीपैकी केवळ 20 लसी बीडच्या वाटणीला आल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी ट्विटद्वारे म्हटले होते. तसंच बीडचे सत्ताधारी माफियांच्या हितासाठी काम करत असल्याची टीकाही त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली होती. यावर आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

"अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर अचानक जागे झालेल्यांना अनेक गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे माहिती घेऊनच बोलावे. कारण यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो आणि त्याचा लसीकरण प्रक्रीयेवर परिणाम होतो," असे धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. तसंच केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या आहेत. तसंच देण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे, असे केंद्राचे निर्देश असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

धनंजय मुंडे ट्विट्स:

बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 आणि कोव्हिशिल्डचे 6800 डोस शिल्लक आहेत. हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. ऑक्सिजन, रेमडेसिवीर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर निर्माण होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती असून जनतेच्या हितासाठी आम्ही लढू, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. त्यासोबतच त्यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून रेमडेसिवीर आणि लसींचा पुरवठा करण्याची मागणीही केली होती. तर माफियाची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मंत्र्यांकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही, असे प्रितम मुंडे यांनी म्हटले होते.