बीड (Beed) जिल्हा आणि मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचीत. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात परस्परांविरुद्ध लढणाऱ्या मुंडे परिवारातील दोन व्यक्ती जर एकाच व्यासपीठावर आल्या तर अनेकांची उत्सुकता वाढलेली असते. असा क्षण बीड करांना पुन्हा अनुभवायला मिळाला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) एकाच व्यासपीठावर आल्याचे काल (30 ऑगस्ट) बीडकरांना पाहायला मिळाले. निमित्त ठरला परळी (Parli) येथील एक कार्यक्रम. या कार्यक्रमात दोन्ही बंधू भगिनी व्यासपीठावर होते. मात्र ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. भाषणांमधून मात्र एकमेकांवर खूप काही बोलले.
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) एकाच व्यासपीठावर आल्याने दोन्ही नेते काय बोलतात. परस्परांबद्दल आणि परस्परांशी काय संवाद साधतात याबाबत अनेकांना उत्सुकता होती. परंतू, दोन्ही नेत्यांनी व्यासपीठावर एकमेकांशी बोलणे टाळले. इतकेच नव्हे तर एकमेकांडे पाहणेही टाळले. परंतू, भाषणासाठी हे दोन्ही नेते जेव्हा आपापल्या वेळी व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा मात्र एकमेकांना चांगलेच टोले लगावताना दिसले. दोघांच्याही भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा, COVID19 3rd Wave: बीडमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकाचा ही मृत्यू होऊ देणार नाही, धनंजय मुंडे यांचा निर्धार)
व्हिडिओ
स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृहाचे लोकार्पण परळी शहरात पार पडले. तसेच, याच वेळी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचेही आयोजन होते. आयोजकांनी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि माजी आमदार पंकजा मुंडे यांचे नाव टाकले होते. त्यामुळे सर्वांनाच या कार्यक्रमाबाबत उत्सुकता होती. दरम्यान, काहींचा कयास होता की या कार्यक्रमाला तिन्ही नेते उपस्थित राहिले तर परस्परांशी संवाद साधतील. पण तसे घडले नाही. या नेत्यांनी थेट भाषणाच्या माध्यमातूनच संवाद साधने पसंत केले.