धनंजय मुंडे (Photo Credits-Twitter)

COVID19 3rd Wave:  देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची आकडेवारी कमी होण्यासह त्याचा प्रादुर्भाव ही घटत चालला आहे. मात्र येणारी कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी आतापासूनच राज्य सरकारकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरु करण्याल आली आहे. याच पार्श्वभुमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एका ही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही असा निर्धार केला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या विरोधात लढण्यासाठी परळी सज्ज असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जरी कोरोनाची तिसरी लाट आली तरीही यामध्ये एकाचा ही मृत्यू होऊ देणार नाही असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. परळी शहरात फ्रंटलाइन वर्कर्सचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका समारोहात धनजंय मुंडे यांनी हे विधान केले आहे.(Fake Vaccination In Mumbai: मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणी मुंबई पोलिसांकडून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी राज्यात डेल्टा प्लस चे 21 रुग्ण समोर आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, 15 मे पासून ते आतापर्यंत 7500 चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 21 प्रकरणात डेल्टा प्लसचा वेरियंट आढळून आला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ आणि मध्य प्रदेशाील भोपाळ येथे सुद्धा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 6270 रुग्ण आढळले असून 13,758 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच गेल्या 24 तासात 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण अॅक्टिव रुग्णसंख्या 1,2,398 असून आतापर्यंत 57,33,215 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर एकूण 1,18,313 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.