भारताचे पहिले जेंटलमॅन, राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांचे पती देवीसिंह शेखावत (Devi Singh Shekhawat) यांचे पुण्यात (Pune) निधन झाले आहे. देविसिंग हे 89 वर्षांचे होते. मागील काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पुण्यात खाजगी रूग्णालयामध्ये दाखल होते. पुण्यातील केईएम रुग्णालयात (Pune KEM Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज (24 फेब्रुवारी) सकाळी त्यांनी 9.30 च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. देविसिंग शेखावत यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
देवीसिंह शेखावत यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 7 वाजता पुण्यातच अंत्यसंस्कार होणार आहेत. अलका टॉकिज जवळ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी देवीसिंह शेखावत यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आल्याने पुण्याच्या केईएम रुग्णालयात दाखल केले होते.
देविसिंग शेखावत कोण होते?
देविसिंग शेखावत यांचि ओळख केवळ प्रतिभा पाटील यांचे पती इतकी मर्यादित नव्हती. ते देखील सक्रिय राजकारणात काम करत होते. सोबतच शिक्षण क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी होती. 1972 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली होती. विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते.
देवीसिंह शेखावत 1985 मध्ये अमरावतीमधून आमदार म्हणून निवडून आले होते. अमरावती शहराचे ते पहिले महापौर देखील होते. दरम्यान देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह 7 जुलै 1965 रोजी झाला होता.
प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. त्यामुळे देवीसिंह शेखावत हे भारताचे पहिले जेंटलमॅन देखील ठरले होते.