Maharashtra Assembly Budget Session 2021: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी घेतली ठाकरे सरकारची शाळा, फेसबुक लाईव्हपासून अनेक मुद्द्यांवर केले भाष्य
CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Budget Session 2021) आज दुसरा दिवस होता. आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) चांगलच धारेवर धरलं. फेसबुक लाईव्ह पासून काल झालेल्या राज्यपालांच्या भाषणावर त्यांनी टिकास्त्र सोडले. त्याचबरोबर कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यांसारख्या गोष्टींवर देखील त्यांनी भाष्य केले. या आणि अनेक मुद्दयांना घेऊन त्यांना राज्य सरकारवर निशाणा साधला. सोबतच 21 फेब्रुवारीचे मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह खूपच उत्तम होते असे सांगत त्यावर खोचक टिका देखील केली.

"सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न आहे. पण, 21 फेब्रुवारी 2021 चं फेसबुक लाईव्ह उत्तम होतं. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का विचारलं…मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले," असा टोला फडणवीसांनी लगावला.हेदेखील वाचा- दिलासादायक! वीज बिल न भरलेल्यांचे वीज कनेक्शन यापुढे तोडले जाणार नाही, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

माझे कुटुंब माझी जबाबदारी वर बोलताना फडणवीस म्हणाले की, आता माझी जबाबदारी म्हणजे सरकारची जबाबदारी नाही. सरकारने हात झटकले अशी अवस्था पाहायला मिळते. राज्यपाल अभिभाषण पुढच्या एक वर्षात काय करणार दिशा दाखवतो पण त्यात काहीच पहायला मिळत नाही. यमक जुळणारी भाषा यशाचे गमक होऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांनी केलेल्या भाषणावर देखील त्यांनी टिकास्त्र सोडले. "त्यांचे भाषण कोणत्या श्रेणीत पडतं? यात यशोगाथा नव्हती वेदना आणि व्यथा दिसतात. आपली बाजू मांडताना त्यात आकडे सत्य सांगितले पाहिजे. पण ते दिसत नाही. चौकात भाषण करतो तस भाषण राज्यपालांना पाठवलं," असं ते म्हणाले.

"कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने ज्याप्रकारे हाताळणी केली असती तर 9 लाख 55 हजार रुग्ण कमी असते, तर 30 हजार 900 मृत्यू महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं? आम्ही सगळ्यात मोठं रुग्णालय विक्रमी वेळेत बांधल्याचं सांगण्यात आलं…पण यात विक्रमी भ्रष्टाचारदेखील झाला. निविदा न मागवता गाद्या, उशा, सलाइन यांवर 60 लाख रुपये खर्च केले. 1200 रुपयांचं थर्मामीटर 6500 रुपयांत खरेदी केली. 2 लाखांच्या बेडशीटसाठी 8.5 लाख भांड दिलं. पंख्याचं 90 दिवसांचं भाडं 9 हजार दिलं. हजार प्लास्टिक खुर्च्यांचं भाडं चार लाख रुपये. लाकडाचे 150 टेबलचं भाडं 6 लाख 75 हजार रुपये….काय काय घोटाळे सांगायचे. जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याची पुस्तिका तयार केली असून मुख्यमंत्र्यांनाही देणार आहे. हा रेकॉर्ड वेळेतील भ्रष्टाचार आहे," असा आरोप फडणवीसांनी केला.