दिलासादायक! वीज बिल न भरलेल्यांचे वीज कनेक्शन यापुढे तोडले जाणार नाही, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
Electricity and Ajit Pawar (Photo Credits: Wikimedia Commons and PTI)

लॉकडाऊनच्या काळात राज्यात लोकांना आलेले भलेमोठे वीज बिल (Electricity Bill) पाहून जनतेला मोठा शॉकच बसला. लॉकडाऊनच्या काळात आलेली बेरोजगारी आणि त्यात ही वीज बिलात झालेली वाढ पाहून नागरिकांना हे वीज बिल ठरलेल्या तारखेत भरणे शक्य नव्हते. त्यामुळे महावितरणाने वीज न भरलेल्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम सुरु केली होती. मात्र याला जनतेसह विरोधकांनी सडकून टिका केली. यामुळे सरकारने माघार घेत यापुढे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी आज अधिवेशनात केली.

राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल म्हणजेच 1 मार्चला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर आज दुस-या दिवशी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वीज कनेक्शन तोडणीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी केवळ नोटिस देऊन अनेक घरगुती, वीज पंप कनेक्शन तोडल्याचे फडणवीसांनी सांगितले.हेदेखील वाचा- Mumbai Power Outage: मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर; वर्तवली Cyber Attack ची शक्यता

'लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते पण नंतर त्यांनी माघार घेतली. या मुद्दावर चर्चा झाली पाहिजे किंवा तात्काळ वीज कनेक्शन तोडकाम थांबवले पाहिजे', अशी मागणी फडणवीस त्यांनी यावेळी केली.

या सर्व गोष्टी लक्षात घेता "अर्थमंत्री अजित पवार यांनी 'वीज कनेक्शन तोडण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे, ती थांबवण्यात येणार आहे. जोपर्यंत वीज बिलाच्या मुद्यावर सभागृहात चर्चा होणार आहे. ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवण्यात येत आहे', अशी घोषणा केली.