
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) गड किल्ले भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयावरून मोठा गदारोळ सुरु आहे. राज्य सरकारने ‘वर्ग 2’ अंतर्गत येणाऱ्या 25 किल्ल्यांची एक यादी जाहीर केली होती. हे किल्ले विकासासाठी हॉटेल व्यावसायिकांना भाडेतत्वावर देण्याचा विचार सुरु होता. मात्र यानंतर विरोधी पक्ष व इतिहासप्रेमी तरुणाईने या निर्णयाला उघडपणे विरोध करत सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शने केली. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील पूजा झोळे (Pooja Zole) या तरुणीच्या फेसबुकपेज वरील व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये पूजाने सिंहगडावरून (Sinhgad) फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच "फडणवीस साहेब तुम्हाला बायका नाचवायच्या असतील तर तुमच्या वर्षा बंगल्यावर किंवा शनिवारवाड्यावर नाचवा' अशा कठोर शब्दात सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.
पूजा झोळे या तरुणीच्या व्हिडीओमध्ये, तिने “शिवाजी महाराजांनी पराक्रमाने गडकिल्ले कमावले. ज्या गडकिल्ल्यांवर आपल्या पूर्वजांनी रक्त सांडत स्वराज्य निर्माण केले अशा वास्तू फडणवीस सरकार लग्न समारंभासाठी आणि हॉटेलसाठी भाड्याने देणार आहेत. अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार? त्यांच्या शनिवारवाड्याला, या रायगडाच्या आणि सिंहगडाच्या वेदना काय कळणार? असा सवाल केला आहे.(महाराष्ट्रातील 25 किल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या चर्चांवर पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण; सचिव विनिता सिंघल यांची माहिती)
"आमच्या किल्ल्यांवर फक्त युद्ध होतात, अशी युद्ध ज्यांचा इतिहास रचला जातो आणि असा इतिहास जो आम्ही अभिमानाने सांगतो. ऐकणाऱ्याच्या अंगावरती शहारे निर्माण होतात. फडणवीस साहेब हा निर्णय तुम्ही लवकरात लवकर मागे घेतला पाहिजे आणि सर्व शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. कारण हे गड-किल्ले म्हणजे आमची अस्मिता आहेत, आमचा इतिहास आहे. तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूला आणि वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा दिली जायची, कडेलोट केला जायचा; त्याप्रमाणे आज या सिंहगडाच्या कड्यावरून आम्ही तुमच्या या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करतेय,’ असं सांगत पूजा हातातील पुतळा खाली फेकून देताना दिसते.
पहा पूजा झोळे व्हिडीओ
दरम्यान हा निर्णय चर्चेत असताना देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. 2016 साली शिवराज्याभिषेक दिनी त्यांनी ‘माझ्याकडून काही चूक झाल्यास माझा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट करा,’ असे म्हंटले होते. यावर आता गडप्रेमींनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.