'मी पुन्हा येईन' असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता
Devendra Fadnavis | Image only representative purpose (Photo credit: File Image)

Devendra Fadnavis Likely To Resign As CM: विद्यमान राज्य सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर या दिवशी संपत आहे. घटनात्मक तरतुदीनुसार तत्पूर्वी नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 14 दिवस उलटून गेले तरी राज्यात नवे सरकार आस्तित्वात आले नाही. सरकारचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही तासच शिल्लख आहेत. त्यामुळे उर्वरीत कालावधीत जर नवे सरकार अस्तित्वात आले नाही तर, घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. परिणामी देवेंद्र फडणवीस यांना घटनात्मक तरतुदीनुसार राजीनामा द्यावा लागणार आहे. ही बाब ध्यानात घेऊन फडणवीस (Devendra Fadnavis) स्वत:च हा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जनादेशाचा विचार करता भाजप हा 105 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, त्या खालोखाल शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणूक 2019 चा जनादेश पाहता भाजप – 105, शिवसेना – 56, राष्ट्रवादी – 54, काँग्रेस – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे सरकार बनविण्याची नैतिक जबाबदारी भाजपवर येते. (हेही वाचा, काँग्रेस आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे पक्षाकडून आदेश, राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा)

पक्षीय राजकारणावर नजर टाकता भाजप-शिवसेना युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आघाडी करुन लढले होते. युती आणि आघाडीत त्यांचे मित्रपक्षही होते. संख्याबळाचा विचार करता भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी युतीचे सरकार सत्तेवर आणायला हवे होते. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपावरुन दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना हे सरकार बनविण्यासाठी राज्यपालांकडे दावा करत नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अस्थितर स्थिती निर्माण झाली असून, राज्य राष्ट्रपती राजवटीकडे निघाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर भाजप सत्तास्थापनेचा दावा करु शकला नाही तर, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात.