देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शरद पवार-पार्थ पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया
Devendra Fadnavis,Parth Pawa, Sharad Pawar, Sushant Singh Rajpu | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि आपले नातू पार्थ पवार (Parth Pawar) यांना कडक शब्दांत जाहीरपणे फटकारले. त्याची प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. परंतू, भाजपच्या गोटातून अद्याप कोणत्या मोठ्या नेत्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखेर प्रतिक्रिया दिली. अर्थात या प्रकरणावर भाजपने थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. फडणवीस यांनीही अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढत म्हटले की, ' नातवानं आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवानं ठरवायचं आहे आणि आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे. त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही.' दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास विरोध नसल्याचे पवार म्हणाले याकडेही फडणवी यांनी लक्ष वेधले. (हेही वाचा, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कोणतीही चर्चा नाही- जयंत पाटील)

पार्थ पवार यांनी पक्षाच्या चौकटीत न बसणारे उद्योग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगलीच गोची झाली होती. पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता राष्ट्रवादीच्या नेत्यांची होणारी तारांबळ पाहता ते सर्वांच्याच ध्यानात येत होते. अखेर स्वत: शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आणि भूमिका स्पष्ट केली.