हजारो मजूर रस्त्यावर उतरणे ही अतिशय गंभीर घटना; जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढणं तर अतिशय दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी आज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा (Lockdown) कालावधी 19 दिवसांनी वाढवण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर मुंबईतील बांद्रा (Bandra) स्टेशनवर हातावर पोट असलेल्या कामगारांनी हजारोच्या संख्यने गर्दी केली. या घटनेमुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. बांद्रा येथे हजारो मजूर रस्त्यावर उतरणे ही अतिशय गंभीर घटना आहे. जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढणं तर अतिशय दुर्दैवी असल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, या मजुरांची व्यवस्था होत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीदेखीव राज्य सरकारने यासंदर्भात उपाययोजना केल्या नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Bandra Incident: मुंबईच्या बांद्रा परिसरात उसळलेल्या गर्दीसाठी Aaditya Thackeray यांनी केंद्र सरकारला ठरवले जबाबदार; 'कामगारांची व्यवस्था करण्यात Union Government ठरले अक्षम')

बांद्र्यातील आजच्या घटनेतून राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. राज्यावर कोरोनाचं संकट असताना अशा परिस्थितीत आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेचं लढावा लागेल, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.