देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबई (Mumbai) मध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. एकीकडे प्रशासन लॉकडाऊन (Lockdown) आणि घरातून बाहेर न पडण्याबद्दल जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या बांद्रा (Bandra) परिसरात हजोरोंच्या संख्येने कामगार वर्गातील लोक जमले होते. या सर्वांना त्यांच्या मूळ गावी परत जायचे होते. सध्या पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, मात्र यामुळे लॉकडाऊनचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. अशात आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी याबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे ट्वीट-
The current situation at Bandra Station, now dispersed or even the rioting in Surat is a result of the Union Govt not being able to take a call on arranging a way back home for migrant labour. They don’t want food or shelter, they want to go back home
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 14, 2020
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू आहे. आता हे लॉक डाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. अशा वेळी आतापर्यंत घरातच काम धंद्याविना बसून असलेले लोक आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी बांद्रा स्टेशनबाहेर जमले होते. लॉकडाऊनच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात हे प्रशासनाचे अपयश म्हणावे लागेल, असे मत व्यक्त होत आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी या गोष्टीसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे.
आदित्य ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘वांद्रे स्थानकातील उद्भवलेली परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल, हे केंद्र सरकारचे अपयश आहे. स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास केंद्र सरकार सक्षम नसल्याचा हा परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा निवारा नको आहे, त्यांना त्यांच्या मूळ घरी परत जायचे आहे.’ (हेही वाचा: Bandra News: लॉक डाऊनचा उडाला फज्जा: संचारबंदी असताना मुंबईच्या बांद्रा परिसरात गावी जाण्यासाठी हजारो लोकांची गर्दी (Video))
आज लॉकडाऊन संपले असे समजून रेल्वे गाड्या सुरु झाल्या असतील अशी आशा या कामगारांना होती. त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इथले हजारो कामगार बांद्रा येथे जमले होते. सध्या तरी पोलिसांनी ही गर्दी पांगवली आहे मात्र सध्याच्या कोरोना व्हायरस संकटाच्या या टप्प्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.