Migrant Workers Come Out on Road in Bandra (Photo Credits: Twitter/@WarisPathan)

Migrant Workers Protest In Bandra: कोरोना व्हायरस (Coronvirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. हे लॉक डाऊन आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. लॉक डाऊनच्या पहिल्या फेजमध्ये 21 दिवस लोक घरात होते, कामधंदे, व्यवसाय, उद्योग बंद होते. यामुळे मुंबई (Mumbai) सारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात काम करणाऱ्या कामगारांचे बरेच हाल झाले. काम बंद, गाठीला पैसे नाहीत त्यात त्यांना शहरातून हलतादेखील आले नाही. मात्र आता लॉक डाऊनमध्ये वाढ झाल्याने या कामगारांचा संयम आणि धीर सुटला आहे व हजारोंच्या संख्येने लोक मुंबईच्या बांद्रा (Bandra) स्टेशनबाहेर जमले होते. या सर्व कामगारांचा त्यांच्या मूळ गावी परत जायचे आहे अशी त्यांची मागणी आहे.

राज्यात कोरोना व्हायरसमुळे संचार बंदी चालू आहे व 4 पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी आहे. अशात मुंबई शहरातील बांद्रा स्टेशनबाहेर हजारोंच्या संख्येने कामगार वर्ग, मजूर जमा झाले होते. त्यांना त्यांच्या गावे परत जायचे आहे अशी त्यांची मागणी आहे. 21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे हे कामगार कसेबसे तग धरून होते मात्र आता लॉक डाऊनमध्ये वाढ झाल्याने इथे काय करायचे? हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. त्यात आज लॉक डाऊनच्या पहिल्या फेज नंतर रेल्वे सुरु होतील अशी आशा त्यांना होती. म्हणूनच आपल्या कुटुंबासह हे सर्व लोक बांद्रा येथे जमले होते.

त्यात बांद्रा स्टेशन परिसरात सरकारतर्फे रेशन वाटपाचे काम सुरु होते त्यामुळे या गर्दीत वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन अडीच तासांपासून ही गर्दी जमा व्हायला सुरवात झाली होती, व आता या लोकांना पांगवण्यासाठी व गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी काही प्रमाणात बळाचा वापर करून सध्या तरी ही गर्दी हटवली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हा जमाव एकत्र आलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा: आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे ग्रुप सदस्य, ऍडमिन्स, निर्माते यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत 'या' कलमाप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल)

भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना एकत्र घेऊन येण्यास कोणाचा हात आहे की नाही? कोणी कोणत्या प्रकारच्या अफवा पसरवल्या की नाही? याबाबतचा तपास केला जाणार आहे. मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या केसेसच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्यात मुंबई व बांद्रा परिसर तर हॉटस्पॉट आहे अशात संचारबंदीचे नियम झुगारून हे लोक घरातून बाहेर पडलेच कसे ? पोलीस प्रशासन त्यावेळी काय करत होते असे प्रश्न जनतेमधूनही उपस्थित होत आहेत.