दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तरी महाविकासआघाडी पेढे वाटते, असा टोला शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाच्या नेत्यांना लगावत विधानसभेती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी जिल्हा परिषद निवडणूक निकालावर भाष्य केले. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकासआघडीला मिळालेले यश आणि भाजपची झालेली पिछेहाट या मुद्द्यावर भाजपची चिंतनबैठक मुंबई (Mumbai) येथे पार पडली. या बैठकीनंतर फडणीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या वेळी बोलताना देवेंद्र फडणीस म्हणाले, राज्यात भाजपचा पराभव झाला असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ते खरे नव्हे. काही ठिकाणी भाजपला पराभवास सामोरे जावे लागले हे खरे आहे. परंतू, आजही राज्यात भाजप हाच पक्ष सर्वात मोठा आहे. नागपूरमध्येही भाजपचा फार मोठा पराभव झाला नाही. इथे केवळ आमचे संख्याबळ कमी आले. सर्व ठिकाणी महाविकासआघाडी करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढले. भाजप हा एकटा लढला. तरीही भाजप हाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचा दावाही फडणीस यांनी या वेळी केला. तसेच, मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीत भाजपच्या जागा अधिक वाढल्या असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका अचानक आल्या. त्यामुळे महाविकासआघाडीसोबत लढण्यासाठी रणनिती आखण्यास हवा तसा वेळ मिळाला नाही. येत्या काळात ही रणनिती नक्की आखली जाईल,असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, महाविकाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल विचारले असता दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून हे पेढे वाटत सुटले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. (हेही वाचा, Maharashtra ZP Election Results 2020: जिल्हा परिषद निवडणूक निकाल फक्त एका क्लिकवर; पाहा पालघर, धुळे, वाशिम,अकोला, नंदुरबार, नागपूर येथे कोणी मारली बाजी)
राज ठाकरे यांच्याबात झालेल्या भेटीबाबत आणि मनसे भाजप यांच्यातील संभाव्य युतीच्या शक्यतेबाबत विचारले असता, मनसे आणि भाजप यांच्यात युती होण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करायची तर मनसेला काही विषयांवर आपली भूमिका व्याप्त करावी लागेल. दोन्ही पक्षांमध्ये अंतर आहे. त्यामुळे मनसेने जर भविष्यात आपली भूमिका व्याप्त केली तर भविष्यात काही घडू शकेल. परंतू, त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.