Nirmala Sitaraman and Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter/ANI and insta)

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज 2021-22 केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या बजेटकडे सर्व जनतेचे लक्ष लागून होते. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळणार, सर्वसामान्यांसाठी, श्रीमंतांसाठी काय विशेष तरतूद करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष होते. तर केंद्र सरकार या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या पदरी काय देणार याचीही सर्वजण वाट पाहात होते. दरम्यान निर्मला सीतारमण यांनी नागपूर मेट्रो (Nagpur Metro) आणि नाशिक मेट्रोसाठी (Nashik Metro) विशेष तरतूदीची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटच्या माध्यमातून नाशिककर आणि नागपूरकरांचे अभिनंदन केले.

"आम्हाला आनंद आहे की भारत सरकारने आमच्या अभिनव दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि नाशिक मेट्रोच्या मॉडेलला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्विकारले. इतकेच नव्हे तर इतर मेट्रो शहरांमध्येही नाशिक मेट्रो मॉडेल राबविण्यात येणार आहे." असे ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी नाशिक आणि नागपूरमधील जनतेचे अभिनंदन केले.हेदेखील वाचा-Union Budget 2021: केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद

आजच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी नागपूर मेट्रो फेज 2, नाशिक मेट्रो फेज 1 ची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुक सेवा सुधाण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय सार्वजनिक बस सेवेसाठी अर्थसंकल्पात 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या बजेमध्ये मेट्रो लाईट आणण्यावर जास्त भर देण्यात आला आहे. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.