Union Budget 2021: केंद्रीय अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद
Nirmala Sitharaman , Metro (PC - twitter/ANI and PTI)

Union Budget 2021: आज वित्तमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर आहेत. यात सीतारमण यांनी रेल्वे तसेच मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी नागपूर मेट्रो फेज 2, नाशिक मेट्रो फेज 1 ची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुक सेवा सुधाण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय सार्वजनिक बस सेवेसाठी अर्थसंकल्पात 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी एकूण 1.10 लाख कोटी रुपयांच्या बजेटची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. यंदाच्या बजेमध्ये मेट्रो लाईट आणण्यावर जास्त भर देण्यात आला आहे. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. (वाचा - Union Budget 2021 Live Updates In Marathi: वित्तीय तूट ही जीडीपी च्या 9.5% असेल : निर्मला सीतारमण)

याशिवाय वर्दळ असणाऱ्या रेल्वेमार्गावर ऑटोमॅटिक पद्धती बसवणार आहे. ज्यासाठी 1 लाख 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयासाठी 1,10,055 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून रस्ते वाहतूक मंत्रालयासाठी 1,18,101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Union Budget 2021: कोरोना व्हायरस लसिकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांचा निधी, निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पात तरतूद)

दरम्यान, निर्मला सीतारमण यांनी पश्चिम बंगालसह निवडणूक असलेल्या राज्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी 1.03 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवसात केरळमध्येही 65 हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग बनवले जाणार आहेत. याशिवाय सीतारमण यांनी मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरोडोअरची घोषणादेखील केली आहे.