Sanjay Raut | Photo Credits: Twitter

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  व उपमुख्यमंत्री पदी अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी एकाएकी पार पडल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. काल रात्री नऊ वाजेपर्यंत अजित पवार आमच्या सोबत बैठकीत उपस्थित होते, पण त्यांच्या हालचाली आणि झुकलेल्या नजरा या संशयास्पद होत्या. स्वतः शरद पवार (Sharad Pawar)  त्यांच्या या कृत्याने चिंतीत होते. बैठकीनंतर एकाएकी अजित पवार गायब झाले आणि त्यांचा काहीही संपर्क होत नव्हता तर सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजले. याबाबत शिवसेनेला किंवा खुद्द राष्ट्रवादीला (NCP) सुद्धा माहिती नव्हती, त्यामुळे अजित पवार यांनी केलेले हे कृत्य रात्रीच्या वेळेत घडलेला व्यभिचार असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळिमा फसला आहे यांना महाराष्ट्राची जनता त्यांना रस्त्यावर सुद्धा फिरू शकणार नाही अशा कठोर शब्दात राऊत यांनी मत व्यक्त केले.

Mahrashtra Government Formation Live Updates: BJP ला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत

वास्तविक काल पर्यंत महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या तसेच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या चर्चा सुरु असताना अचानक आज सकाळी घडलेला हा शपथविधी धक्कादायक आहे. यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेचा रोष संजय राऊत यांनी व्यक्त केला. "अजित पवार यांची जागा आर्थर रोड जेल मध्ये आहे असे म्हणणारे फडणवीस आज त्यांच्याच सोबत मिळून सत्तास्थापन करतात यावरून बाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते हे स्पष्ट आहे. आता सत्ता स्थापन केळ्यावर मंत्र्यांच्या बैठका आर्थर रोड जेल मध्ये घडणार का हे पाहायचंय अशा शब्दात राऊत यांनी या शपथविधीवर टीका केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी अजित पवारांच्या या वागणुकीने शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेल्याचे देखील म्हंटले होते. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी राऊत यांना धारेवर धरत, त्यांना शाब्दिक अतिसार झाला असे म्हंटले आहे, अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही सुधारायला हवे असे म्हंटले आहे. तर दुसरीकडे आपला पदाभार स्वीकारल्यानंतर, अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, राज्यात स्थिर सरकार यावे म्हणूनच हे पाऊल उचलल्याचे म्हंटले आहे.