महाराष्ट्रात सलग पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये काही मोजक्याच मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यापैकीच एक. पण गंमत अशी की महाराष्ट्रात सर्वात कमी कार्यकाळ लाभलेल्या सरकारचा (Devendra Fadnavis-Ajit Pawar Government) मुख्यमंत्री असा विक्रमही देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याच्या त्या ऐतिहासिक घटनेला आज (23 नोव्हेंबर) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेकडे सुरुवातीला राजकीय भूकंप आणि पुढे विनोद म्हणूनही पाहिले जाऊ लागले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी या दोघांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली होती.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे हा सोहळा पार पडला. शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन खेचाखेची सुरु होती. यावरुन नाराज शिवसेना राज्यात नव्या पर्यायाच्या शोधात होती. एका बाजूला शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्याची पायाभरणी सुरु होती. दुसऱ्या बाजूला भाजप 105 आमदार आल्याने आक्रमक होता. त्यामुळे राज्याचे राजकारण कोणते वळण घेणार याबाबत उत्सुकता होती. (हेही वाचा, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी दिली 'ही' मजेशीर प्रतिक्रिया)
दरम्यान, रातोरात सूत्रे हालली. महाराष्ट्रात लागू असलेली राष्ट्रपती राजवट हविण्यात आली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भल्या पाहटे राजभवनात दाखल झाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह काही मोजके लोकही राजभवनावर उपस्थित होते. विशेष म्हणजे एएनआय ही वृत्तसंस्था वगळता प्रसारमाध्यमांना याची किंचीतही कल्पना नव्हती. अखेर थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाच दिसले. महाराष्ट्रात एक नवे आणि विचित्रच पद्धतीने सरकार सत्तेत आले.
व्हिडिओ
#WATCH Mumbai: Devendra Fadnavis takes oath as Maharashtra Chief Minister again, oath administered by Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/kjWAlyMTci
— ANI (@ANI) November 23, 2019
दरम्यान, रातोरात सूत्रे हालवून पहाटे पहाटे स्थापन झालेले हे सरकार अल्पावधीतच कोसळले. देशात खळबळ माजली. सन 2014 पासून सत्तेचा चौखुर उधललेला भाजपचा वारू रोखल्याचे पाहायला मिळाले. इतक्या प्रयत्नांनी आणलेले हे सरकार कोसळणे हे केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान गृहमंत्री तत्कालीन भाजपअध्यक्ष अमित शाह यांच्यासाठीही नामुष्कीजनक होते. आज या सर्व प्रकाराबाबत विचारले असता 'शपथविधी करुन चूक केली. आपण हे केले नसते तर बरे झाले असते', अशी सल देवेंद्र फडणवीस बोलून दाखवतात.