कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत
Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यंदा त्यांचा वाढदिवस (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर कुणीही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करु नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनदेखील अजित पवार यांनी केलं आहे.

22 जुलै रोजी अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे हा वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करु नये. भेटीगाठी टाळाव्यात. त्याऐवजी आपली शक्ती कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी वापरावी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - राज्यातील 28 हजार वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे 2 महिन्यांचे मानधन एकत्रितपणे अदा करणार; सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती)

यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, माझ्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, पाठिराख्यांच्या, हितचिंतकांच्या, राज्यातील तमाम जनतेच्या शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितंच खूप मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. परंतु, कृपया त्या शुभेच्छा ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स्‌ॲप, ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे पाठवाव्यात. प्रत्यक्ष भेटीसाठी कोणीही येऊ नये, असं आवाहनदेखील अजित पवार यांनी केलं आहे.