चित्रपट ‘कहाणी’मध्ये अनेकांनी बॉम्बे ब्लड ग्रुपचा (Bombay Blood Group) उल्लेख ऐकला असेल. तर गेल्या आठवड्यात बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणून ओळखल्या जाणार्या या दुर्मिळ रक्तगटाच्या प्रकारची अचानक मागणी वाढली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार मुंबईतील (Mumbai) अनेक रूग्णालयातील अनेक रूग्णांना या युनिटची गरज भासली आहे, परिणामी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील इतर भागांमधून बॉम्बे रक्तगट मागवले जात आहेत. हा दुर्मिळ रक्त गट 7,600 लोकांमध्ये एका व्यक्तीकडे आढळतो. त्यामुळे याचे रक्तदाते फार कमी असतात. संपूर्ण भारतात हा रक्तगट असणारे फक्त 350 लोकच आहेत, त्यापैकी 35 लोक मुंबईमध्ये आहेत.
रिपोर्टनुसार, राज्य सरकारची ब्लड-ऑन-कॉल सेवा सहसा एका तासापेक्षा कमी अंतरावर रक्ताची वाहतूक करते. याची आंतरराज्यीय सेवा अद्याप सुरू झालेले नाही. त्याशिवाय, रक्ताची वाहतूक ही फार महाग आहे, कारण वाहतुकीच्या जास्त काळात रक्त एका ठराविक पद्धतीने संरक्षित करावे लागते. (हेही वाचा: रक्तदानाबाबतच्या या 10 समज-गैरसमजांमुळे तुम्हीही रक्तदान करत नाहीत का?)
मुंबईमधील रुग्णांना बॉम्बे ब्लड ग्रुप देण्यासाठी नुकतेच सांगली व पुण्याहून रक्तदात्यांना बोलावण्यात आले आहे. आताही मुंबईच्या नायर, हिंदुजा, जे.जे. आणि इतर मोठ्या रुग्णालयांमध्ये या दुर्मिळ रक्तगटाची गरज आहे. 1952 मध्ये वाय.एम. भेंडे या डॉक्टरांनी मुंबईत (त्यावेळी बॉम्बे) याचा शोध लावल्यानंतर या ठिकाणच्या नावावरून या रक्त गटाला हे नाव ठेवण्यात आले.