दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी CAA, NRC, GST, शेतकरी पीकविमा योजना या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Narendra Modi And Uddhav Thackeray Meet In Delhi (Photo Credits: Twitter/ PMO)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज 21 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली, यावेळी राज्य आणि केंद्र सरकारमधील काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती ठाकरे यांनी भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. काही दिवसांपूर्वी CAA, NRC आणि NPR च्या मुद्द्यावरून मांडलेल्या आपल्या मतावर पून्हा एकदा ठाम भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेने घाबरू नये असे आवाहन केले आणि CAA हा मुद्दा कोणाच्याही विरुद्ध नाही तसेच NPR हा जनगणनेच्या समान स्तरावरील पर्यायी मार्ग आहे त्यामुळे यातून कोणाचेच नुकसान होणार नाही मात्र असे असले तरीही आपण राज्यात NRC लागू होऊ देणार नाही असे आज ठाकरे यांनी स्पष्ट केले, याबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे ठाकरे म्हणाले.आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्र सरकारला जीएसटीशी संबंधित पत्र लिहिण्यात आले होते त्यावर सुद्धा मोदींशी चर्चा केली असता, राज्य सरकाराला जीएसटीच्या मार्फत कर परतावा मिळत आहे पण या मिळकतीची गती किंचित धीमी आहे असे या चर्चेतुन समोर आल्याचे मुख्यमंत्र्यानी म्हंटले आहे. याशिवाय ही एक सदिच्छा भेट असून आपण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच दिल्लीची वारी केली आहे आणि त्या निमित्तानं मोठा भाऊ (नरेंद्र मोदी) यांची भेट घेतल्याचा आनंद देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोणतीही ठिणगी नाही, उलट राज्याच्या वृद्धीसाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वसन मोदींनी दिले आहे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. या भेटींनंतर आज रात्री ९ वाजता उद्धव ठाकरे हे गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार आहेत.