सोलापूरचे पालकमंत्री पुन्हा बदलले; राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या जागी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची नियुक्ती
Jitendra Awahad And Dattatray Bharne (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या (Solapur) राजकारणात मोठा बदल घडून आला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री (Solapur Guardian) पदात गेल्या 30 दिवसांत हा तिसरा बदल आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या जागी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणाबाबत मोठी चर्चा रंगली आहे. 15 दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाडांकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला होता. परंतु, लॉकडाऊनमुळे आव्हाडांना सोलापूरला जाताच आले नाही. त्यामुळे आता दत्ता भरणे यांना सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

दत्ता भरणे यांच्याकडे आतापर्यंत एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नव्हते. सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे राज्यमंत्री म्हणून ते काम पाहतात. दरम्यान, दत्तात्रय भरणे उद्याच प्रशासनाची बैठक घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच पालकमंत्रीपदावर विराजमान होताच त्यांनी सोलापूरला कोरोनामुक्त करण्याला प्राधान्य देणार, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी दिली. हे देखील वाचा- Lockdown: समुद्रात मरिला डिस्कव्हरी क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या 146 खलाश्यांची अखेर सुटका

ट्वीट- 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरत्या स्वरुपात बदलण्यात आले आहेत. कॉंग्रेस मंत्री विश्वजीत कदम यांच्या जागी कॉंग्रेस मंत्री सुनील केदार यांच्याकडे भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी तूर्तास सोपवण्यात आली आहे. तर,शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तात्पुरते सुपूर्द करण्यात आले आहे.