Datta Sane Passes Away: दत्ता साने यांच्या निधनानंतर चिखली-मोरेवस्ती परिसरात दु:खाचे सावट
Datta Kaka Sane | (PC -Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसवेक दत्ता साने (वय 47 वर्षे) यांचे कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सानेचौक (Sane Chowk), चिखली (Chikhali), मोरेवस्ती (More Vasti) परिसरासह पिंपरी चिंचवड (PCMC) महापालिकेतही दु:खाचे सावट पसरले आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात साने यांचे निधन झाले. या परिसरात ते दत्ता काका साने नावाने परिचीत होते. साने यांच्या पश्चात आई, पत्नी हर्षदा, मुलगा यश (वय-19 वर्षे), कन्या (वय 16 वर्षे) तसेच दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

दत्ता साने अल्प परिचय

दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरसेवक होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत ते चिखली परिसरातून प्रभाग क्र. 1 मधून ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. सध्याही ते विद्यमान नगरसेवक होते. मधल्या काळात त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदही मिळाले होते. ते त्यांनी आक्रमकपणे सांभाळले होते. महापालिका 'अ' क्षेत्रिय कार्यालय समितीचे ते माजी अध्यक्ष होते. याशिवय एक अभ्यासू आणि आक्रमक स्थानिक नेता अशीही त्यांची ओळख होती. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. ते विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट न दिल्याने त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत अजित पवार यांचे ते अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जात. (हेही वाचा, NCP Corporator Datta Sane Passes Away: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन)

कोरोना व्हायरस संकट काळात त्यांनी स्थनिक नागरिकांना मदत केली होती. लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांच्या नोकरी आणि उत्पन्नावर मर्यादा आली होती. अशा काळात त्यांनी गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप केले होते. या वेळी त्यांचा अनेक नागरिकांशी संपर्क आला होता. या संपर्कामधूनच त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला असावा असे सांगण्यात येत आहे. 25 जून या दिवशी त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांचे निधन झाले.