NCP Corporator Datta Sane Passes Away: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन
Datta Kaka Sane | (PC -Facebook)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri‑Chinchwad Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (Datta Sane) यांचे निधन झाले आहे. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज (शनिवार, 4 जुलै 2020) सकाळी त्यांचे निधन झाले. चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 25 जून 2020 या दिवशी त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिखली-मोरेवस्ती परिसरातून नगरसेवक होते. या परिसरातून ते सलग 3 वेळा निवडूण आले होते. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. दत्ता साने यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचा चाचणी अहवाल 25 जून या दिवशी प्राप्त झाला. तेव्हापासून चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. (हेही वाचा, Coronavirus: ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक मुकुंद केणी यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन)

दत्ता साने हे परिसरात दत्ता काका साने या नावाने ओळखले जात. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही कामगिरी बजावली होती. पिंपरी चिंचवड महापालिका महापौर पदाचे दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. तसेच, विधानसभा निवडणुकीवेळीही ते उमेदवार राहणार अशी चर्चा होती.