MNS, MNS D-Mart | (Photo Credits: X)

मुंबई येथील अंधेरी (पश्चिम) परिसरातील एका डी-मार्ट (D-Mart) कर्मचाऱ्यावर ग्राहकासोबत मराठी भाषेत (Marathi Language) बोलण्यास नकार दिल्याचा आणि हिंदी भाषेत आरेरावी केल्याचा आरोप आहे. या कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी जाब विचारत कथितरित्या मारहाण केल्याचे वृत्त आहे. सदर कर्मचाऱ्याने 'मला मराठी नही आती, जो कुछ करना है वो कर लो' असे म्हणत ग्राहकाशी हुज्जत खातल्याचे समजते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जाऊन सदर कर्मचाऱ्याची कानउघडणी केली. सदर घटना 25 मार्च रोजी रिटेल चेनच्या वर्सोवा आउटलेटमध्ये घडल्याची माहिती आहे.

हिंदी भाषकाची मराठीवर आरेरावी

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनुसार डी-मार्ट कर्मचाऱ्याने एका मराठी ग्राकासोबत स्थानिक (मराठी) भाषेत संवाद साधण्यास कथीतरित्या नकार दिला. इतकेच नव्हे तर त्याने 'नही आता मुझे मरठी, मैं हिंदी ही बोलेगा, क्या करेगा? जो करना है वो कर' (मला मराठी येत नाही. मी फक्त हिंदीत बोलेन. तुम्हाला जे हवे ते करा.) असे म्हणत हिंदी भाषेत अरेरावी केल्याचा एक व्हिडिओही पुढे आला आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडिओतही या कर्मचाऱ्याचे अशा प्रकारचे उद्धट बोलणे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Charkop Airtel Employee Refuses to Speak Marathi Viral Video: 'क्यू मराठी आना चाहिए?' असं उद्दामपणे विचारणार्‍या महिला कर्माचारीला कामावरून काढून टाकत एअरटेल ने जारी केला माफीनामा)

शाब्दिक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओ मनसे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी मनसेचे वर्सोवा अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली डी-मार्ट गाठले आणि सदर कर्मचाऱ्यास जाब विचारला. या वेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर तीव्र संघर्षात झाले. त्यानंतर मनसे सदस्यांनी सदर कर्मचाऱ्यास कथितपणे चापटवले. (हेही वाचा, वाचा: Raj Thackeray On Bhaiyyaji Joshi's Remark On Language Of Mumbai: भय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे झाले आक्रमक; 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं')

मनसे कार्यर्त्यांची आक्रमक भूमिका

मनसेचा इशारा आणि कर्मचाऱ्याकडून माफी

पीटीआयच्या वृत्तानुसार, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात मनसे कार्यकर्ते कर्मचाऱ्याला चापट मारताना आणि त्याच्या मुंबईत येण्याबद्दल विचारपूस करताना दिसत आहेत. त्यांनी त्याला असा इशारा दिला होता की जर त्याला दुकानात काम करायचे असेल तर त्याने मराठी शिकले पाहिजे. अखेर, दुकानातील कर्मचाऱ्याने माफी मागितली.

मनसेने विचारला जाब

मुलुंडमध्येही अशीच घटना

हिंदी भाषकाची मराठी ग्राहक आणि भाषेवर अरेरावी होण्याची ही पहिलीच घटना नाही. जानेवारी महिन्यात मुलुंडमधील एका फास्ट-फूड स्टॉलवरही असाच एक वाद झाला होता, जिथे मनसे कार्यकर्त्यांनी एका मराठी भाषिक कुटुंबाशी गैरवर्तन केल्याबद्दल एका कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, मानसी मेगा नावाची एक महिला आणि तिची आई बँकेच्या कामासाठी मुलुंडला गेल्यानंतर स्टॉलवर थांबल्यावर हा वाद सुरू झाला. स्टॉल कामगाराने त्यांना शिवीगाळ करत म्हटले: जर तुम्हाला ते परवडत नसेल तर तुम्ही इथे जेवायला का आलात?

जेव्हा मानसीने त्याच्या वागण्यावर प्रश्न विचारला तेव्हा कर्मचाऱ्याने तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली. धमकी मिळाल्याने त्यांनी मदतीसाठी मनसे जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच, मनसे कार्यकर्ते स्टॉलवर आले आणि या मायलेकींना मदत केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्याला कॉलर पकडून, थप्पड मारून आणि स्टॉलमधून बाहेर काढल्याचे दिसते. हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या कामगारालाही थप्पड मारण्यात आली आणि इशारा देण्यात आला. सुरुवातीला, स्टॉल कामगाराने कोणतेही चुकीचे काम केल्याचे नाकारले, परंतु मानसीचे म्हणणे ऐकल्यानंतर, मनसे सदस्यांनी त्याला माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर कडक इशारा देऊन ते निघून गेले.

भाषेवरून राजकीय वादविवाद तीव्र

महाराष्ट्रात भाषा लादण्यावरून संताप आणि वादविवाद निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला टीकाकारांनी मनसेच्या आक्रमक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाने बऱ्याच काळापासून मराठी ओळख आणि भाषिक अभिमानाचा पुरस्कार केला आहे, अनेकदा राज्यात गैर-मराठी भाषिकांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. भाषिक समावेशकता आणि रोजगार हक्कांवरील चर्चांना वेग येत असताना, अधिकाऱ्यांनी अद्याप या घटनांवर कारवाई केलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ फिरत आहेत आणि नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.