Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या रस्त्याचे International Road Federation कडून ऑडिट; आढळल्या अनेक त्रुटी
Cyrus Mistry | File image)

इंटरनॅशनल रोड फेडरेशन (International Road Federation) ने गुजरातमधील वापी आणि महाराष्ट्रातील मनोर-पालघर दरम्यानच्या 70 किमी लांबीच्या रस्त्याचे ऑडिट केले. या ऑडिटनंतर तयार करण्यात आलेल्या अहवालात या मार्गांवर 30 हून अधिक रस्ते सुरक्षेचे धोके असल्याचे सूचित करण्यात आले आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) आणि त्यांच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे पालघरजवळील हे ठिकाण सप्टेंबरपासून चर्चेत आहे. या घटनेच्या पार्श्वभुमीवर इंटरनॅशनल रोड फेडरेशनने हे सर्वेक्षण केले आहे.

फेडरेशनचे मानद अध्यक्ष के के कपिला म्हणाले की, ऑडिटनंतर अपघात रोखण्यासाठी काही कमी खर्चातील तत्काळ उपाययोजनांची शिफारस केली आहे. कपिला म्हणाले की, या तात्काळ उपायांमध्ये वळणाचे मार्ग आणि पुलांपूर्वी कमाल वेग मर्यादा दर्शविणारी चिन्हे चिन्हांकित करणे, ओव्हरटेकिंगविरूद्ध चेतावणी, त्वरित देखभाल, अधील-मधील मोकळ्या जागा बंद करणे आणि चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी योग्य चिन्हे दर्शवणे यांचा समावेश आहे.

पालघरमध्ये झालेल्या भीषण अपघाताच्या आठवडाभरानंतरच हे ऑडिट करण्यात आले. आयआरएफने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या सहमतीनंतर लेखापरीक्षण करण्यात आले आणि अहवाल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि NHAI यांना कारवाईसाठी सादर करण्यात आला आहे. (हेही वाचा: School Bus Accident Pune: स्कूल बस दरीत कोसळली, 4 विद्यार्थी जखमी; पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घटना)

आयआरएफ इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष सतीश पारख म्हणाले की ऑडिटमध्ये असे आढळून आले आहे की, 'ज्या ठिकाणी हा जीवघेणा अपघात घडला, तिथे तिसर्‍या लेनकडे जाण्यासाठी एक साधे वळण आहे, जे योग्य संकेत न देता अशास्त्रीय आणि अप्रमाणित मार्गाने बनवले गेले आहे.’ अहवालात म्हटले आहे की मानक डिझाइननुसार कोणत्याही सहा पदरी महामार्गावर मध्यमार्ग नसावा. निवेदनानुसार, अहवालात लवकरात लवकर मध्यभागी खुले मार्ग बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.