School Bus Accident Pune:  स्कूल बस दरीत कोसळली, 4 विद्यार्थी जखमी; पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घटना
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

पुणे (Pune) जिल्ह्यात शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात (School Bus Accident Pune) झाला. या अपघातात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. शाळेची बस दरीत कोसळल्याने हा अपघात घडला. अपघात घडला त्या वेळी बसमध्ये 3 शिक्षक आणि एकूण 44 विद्यार्थी होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) घोडेगाव परिसरात घडली. जखमी विद्यार्थ्यांना मंचर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमधील सर्व विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील होते असे समजते आहे.

अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळघोडे येथील मुक्ताई प्रशालेची एक बस 44 विद्यार्थी विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. बसमधील सर्व विद्यार्थी हे आयुका दुर्बीण पाहण्यासाठी निघाले होते. दरम्यान, एका वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या वेळी कोणतेही जीवित हानी झाली नाही. परंतू, बऱ्याच विद्यार्थ्यांना मुक्कामार लागला. काही जखमी झाले. चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्याना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेलाही माहिती देण्यात आली. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले. वेळीच मदत आणि बचाव कार्य सुरु झाल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, विद्यार्थी आणि पालक यांच्यात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.