Cyber Crime News Pune: पुणे शहरात सायबर क्राईम घटनांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त आम्ही आज (24 सप्टेंबर) सकाळीच दिले आहे. त्यावरुन शहरात सायबर भामट्यांचा किती सुळसुळाट झाला आहे हे पुढे आलेच. दरम्यान, अशीच आणखी एक घटना घडली आहे. ज्यामध्ये ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाची तब्बल तीन लाख रुपयांना फसवणूक झाली आहे. ही घटनासुद्धा पुणे शहरातच घडली आहे. पुणे जिल्ह्यातील उंद्री येथे ही घटना घडली आहे. नोकरीच्या चांगल्या संधी मिळवण्याच्या इच्छेने प्रेरित झालेला हा तरुण ऑनलाइन जॉब पोर्टलवर (Online Job Portal Fraud) त्याचे प्रोफाईल अपलोड करून नोकरी शोधत होता. दरम्यान, तो सायबर भामट्यांच्या जाळ्यात सापडल्याने त्याची 3.7 लाख रुपयांची फसवणूक झाली.
कोणताही त्रास नसलेली अगदी आरामदायी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी तरुणाला हेरले. तो नोकरीच्या शोधात आहे हे लक्षात येताच त्यांनी त्याला बळीचा बकरा बनवले. सोशल मीडिया प्रोजेक्टच्या माध्यमातून त्याला अर्थवेळ (पार्ट टाईम) नोकरी देण्याचे आणि त्या नोकरीत तो बॉस असल्याचे भासवून त्याची सायबर क्राईम द्वारे आर्थिक फसवणूक केली. सुरुवातीला त्याचा विश्वास बसावा यासाठी गुगल मॅप रिव्हिव्हकरण्याचे काम त्याला दिले. त्यानंतर त्यांनी त्याच्या खात्यावर काही रक्कमही वळती केली. आलेले पैसे पाहून तरुणाचा विश्वास अधिक बसला. त्यानंतर गुन्हेगारांनी त्याला आणखी एका प्रोजेक्टमध्ये सहभागी करुन घेण्याचे आमिष दाखवले. या वेळी मात्र त्याच्याकडून अधिक पैसे उकळले. मग त्यांनी त्याची चांगलीच फसवणूक केली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुण हा एका खासगी कंपनीत काम करतो. सायबर गुन्हेगारांनी त्याला ते गुगल मॅप रिव्हीव्ह करण्याचे काम असल्याचे त्याला सांगितले. त्यासाठी अनामत रक्कम म्हणून काही पैसे जमा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी पैसे उकळले.
आपण फसवलो गेलो आहोत याची माहिती आणि धक्का तरुणाला तेव्हा बसला. जेव्हा गुन्हेगारांनी त्याला घेतलेले पैसे परत द्यायला आणि केलेल्या कामाचेही पैसे द्यायला नकार दिला. पैसे मिळताच त्यांनी तरुणास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देणेच बंद केले. उलट त्यांनी त्याला सांगितले की, तुला तुझे पैसै परत हवे असतील तर आणखी 50,000 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर मात्र तरुणाची खात्राी पटली की, त्याची फसवणूक झाली आहे. पुढे सायबर गुन्हेगार त्यांच्या डिजिटल विश्वात गायब झाले. इकडे तरुण मात्र चडफडत राहिला.