महाराष्ट्रामध्ये सायबर क्राईमच्या देखील अनेक घटना समोर येत आहेत. आजकाल अनेक लहानमोठे आर्थिक व्यवहार ऑनलाईन सहज होतात. पण त्यामधूनच सायबर गुन्हेगारी देखील वाढली आहे. या सायबर क्राईमचा फटका काही स्वामी भक्तांनादेखील बसला असल्याची बाब समोर आली आहे. सोलापूरात अक्कलकोट स्वामींच्या (Akkalkot Swami Bhakt Niwas) दर्शनाला अनेक भाविक येतात. आल्यानंतर मंदिर परिसरातच राहण्याची सोय व्हावी म्हणून भक्तनिवास मध्ये बुकिंग करतात. पण त्याच ऑनलाईन बुकिंग (Online Booking) करताना काहींना फसवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, ऑनलाईन बुकिंग कराताना इंटरनेटवर काही ठिकाणी भक्त निवासच्या नावे खोटी माहिती आणि फोन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खोट्या संकेतस्थळावर वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवासाचे फोटो लावून अन्य हॉटेलचे फोटो लावून लोकांची फसवणूक केली जात आहे. सोबतच मोबाईल नंबर वर जेव्हा भाविक बुकिंगसाठी संपर्क करत होते तेव्हा आधारकार्ड नंबर मागितला जात होता. गैरसोय टाळण्यासाठी काही पैसे देखील पाठवायच्या सूचना केल्या जात होतात. भाविक देखील राहण्याची बिनदिक्कत सोय व्हावी म्हणून काही रक्कम ट्रान्सफर करत होते.
ऑनलाईन बुकिंग करून जेव्हा भाविक भक्तनिवासामध्ये पोहचत होते तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येत होता. 15-20 भाविकांसोबत अशाप्रकारे फसवणूक झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. एबीपी माझा च्या रिपोर्टनुसार, फसवणूक झालेल्या भक्तांची माहिती मंदिर प्रशासनाकडे देण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने पोलिसांना हा प्रकार सांगितला असून तेथूनही हे प्रकरण सायबर पोलिसांकडे देण्यात आले आहे.
मंदिर प्रशसनानेही 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस' तत्त्वावर भाविकांना भक्तनिवास दिला जातो. यामध्ये कोणत्याही आर्थिक व्यवहारांची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.