वाढत्या कोविड-19 (Covid-19) रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात आजपासून (गुरुवार, 1 एप्रिल) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 1 ते 15 एप्रिल पर्यंत संचारबंदी असेल. या काळात सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. अत्यावशक सेवांसोबतच भाजीपाला, फळं, नाशवंत वस्तूंची दुकानं, बेकरी, किराणा दुकानं देखील सुरु राहतील. मात्र दुपारी 1 नंतर कडक संचारबंदी असेल. तसंच दुपारी 1 नंतर शहरात बाहेरुन येणाऱ्या वाहनांना देखील प्रवेशबंदी असेल. (Lockdown in Aurangabad: औरंगाबाद मधील 10 दिवसांचा लॉकडाऊन रद्द)
मागील काही काळापासून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील विविध भागांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण लॉकडाऊनचा इशाराही अनेकदा सरकारकडून देण्यात आला आहे. मात्र जनतेसह इतर पक्षांचा विरोध लक्षात घेता कडक नियम लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, जनतेने कठोर निर्बंधांसाठी तयारी ठेवावी, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आले आहे. (कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील जनतेने कठोर निर्बंधासाठी तयार रहावे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा)
काल राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. 39,544 नव्या रुग्णांसह 227 मृतांची नोंद करण्यात आली. तर 23,600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या नव्या भरीनंतर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 28,12,980 वर पोहचला असून 54,649 मृतांची नोंद झाली आहे. एकूण 24,00,727 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या राज्यात 3,56,243 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील दिवसागणित वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करणे, आवश्यक आहे.