राज्यातील इतर जिल्ह्यांसह औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र उद्यापासून लागू होणारा 10 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिली आहे. उद्या (31 मार्च) मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असून पुढील आदेशापर्यंत औरंगाबादमध्ये लॉकडाऊन होणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे औरंगाबादकरांना दिलासा मिळाला आहे. (Lockdown In Beed: बीडमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता; धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश)
लॉकडाऊन रद्द करण्यात आला असला तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सुरुवातीला 30 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत लॉकडाऊन होणार होता. मात्र त्यानंतर लॉकडाऊनच्या कालावधीत बदल करण्यात आला. 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान लॉकडाऊन होणार असं जाहीर करण्यात आलं. परंतु, आता लॉकडाऊनचा निर्णयच मागे घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी 10 दिवस लॉकडाऊन होणार म्हणून नागरिकांची गेल्या काही दिवसांत चांगलीच धांदल उडाली होती. (Lockdown in Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊन? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महत्त्वाचे विधान)
दरम्यान, राज्यात मागील 24 तासांत 27,918 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 139 जणांचा मृत्यू झाला आहे. 23,820 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,73,436 इतकी झाली असून 54,422 मृतांची नोंद झाली आहे. एकूण 23,77,127 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 3,40,542 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.