बॉलिवूड मेगास्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) मुंबई क्रूज ड्रग्ज आणि रेव्ह पार्टी प्रकरणी सध्या एनसीबी (NCB) तपास करीत आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांची टीम या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कोनातून चौकशी करत आहे. आता एनसीबीची हेरगिरी केली जात असल्याची बातमी समोर येत आहे. खुद्द समीर वानखेडे यांनी याबाबत तक्रार केली आहे. समीर वानखेडे हे मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा स्मशानभूमीतील समीर वानखेडे यांच्या वॉकचे सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आले आहे.
या प्रकरणाबाबत समीर वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या डीजीपीकडे तक्रार केली आहे. समीर वानखेडे यांच्यावर नजर ठेवली जात असल्याची ही तक्रार आहे. ही तक्रार करण्यासाठी समीर वानखेडे यांनी त्यांच्या एका सहयोगी अधिकाऱ्यासह महाराष्ट्राचे डीजीपी यांची भेट घेतली. पुरावा म्हणून समीर वानखेडे यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही दिले आहे. समीर वानखेडे यांच्या आईची थडगे ओशिवरा स्मशानभूमीत आहे. ते अनेकदा याठिकाणी भेट देतात.
Mumbai: Narcotics Control Bureau (NCB) officials met senior officials of Mumbai Police and complained to them about being followed by Mumbai Police officials in the past few days.
— ANI (@ANI) October 11, 2021
समीर वानखेडे यांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला आहे की, एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचाही पाठलाग केला जात आहे. तसेच सिव्हील ड्रेसमधील काही लोक त्यांच्या मागावर होते. समीर वानखेडे हे एनसीबीचे तपास अधिकारी आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या टीमने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजमध्ये ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीवर छापा टाकला. 2 ऑक्टोबरच्या (शनिवारी) रात्री झालेल्या या छाप्यात आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा: Drugs-on-Cruise Case: आरोपी आर्यन खान आणि इतरांच्या जामीन याचिकांवर बुधवारी होणार विशेष NDPS कोर्टात सुनावणी)
या ड्रग्ज रॅकेटच्या संदर्भात एनसीबीने आतापर्यंत 20 लोकांना अटक केली आहे. या प्रकरणात आर्यन खान सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. एनसीबीकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 6 महिने आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांचे एक्स्टेन्शन आणखी 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहे.