दीपक आबा दाखले (संग्रहित-संपादित प्रतिमा)

गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक अॅप (TikTok App) बरेच चर्चेत आहे. कोर्टाने  घेतलेला आक्षेप, त्यावर युजर्सची प्रतिक्रिया अशा अनेक गोष्टींनीच याचे महत्व आणखीन वाढवले. टिकटॉकवर ज्या पद्धतीचे व्हिडीओ बनवले जात आहेत त्यावर कोर्टाने आक्षेप घेतला होता. आता पुणे पोलिसांना एका गुंडाचा हातात हत्यार घेऊन बनवला गेलेला व्हिडीओ हाती लागला आहे. पोलिसांनी ताबडतोब या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दीपक आबा दाखले (वय 23, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून, त्याने ‘वाढीव दिसताय राव’... या लावणीवर हा व्हिडीओ बनवला होता.

दीपकने आजूबाजूच्या परिसरात आपली दहशत पसरवण्यासाठी हातात कोयत्यासारखे हत्यार घेऊन टिकटॉक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये दीपक वाढीव दिसताय राव या गाण्यावर, हातात ते हत्यार घेऊन घरातून बाहेर येताना दिसतो. पोलिसांच्या हाती जेव्हा हा व्हिडिओ लागला तेव्हा सापळा रचून पोलिसांनी दीपकला पकडले. (हेही वाचा: Tik Tok पुन्हा वादात, जामा मशिदीत डान्स व्हिडीओ बनवल्याने यापुढे केवळ प्रार्थनेसाठीच मिळणार प्रवेश)

याआधी नागपूर आणि औरंगाबाद येथे अशाप्रकारे हत्यारे घेऊन बनवण्यात आलेले व्हिडिओ व्हायरल झाले होते. पोलिसांनी त्या गुन्हेगारांवरही कारवाई केली होती. आता पुन्हा अशी कारवाई पार पडली आहे. दरम्यान कोणी अशा प्रकारे दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ बनवत असेल तर, ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.