उद्यापासून गाई-म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागणार; राज्यातील दूध कल्याणकारी संघाचा निर्णय
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

उद्यापासून (रविवार) गाई-म्हशीचे दूध (Cow-Buffalo Milk) 2 रुपयांनी महागणार आहे. राज्यातील दूध कल्याणकारी संघाने याबाबत निर्णय घेतला आहे. नव्या दरांनुसार, गाईचे दूध 48 रुपये तर म्हशीचे दूध 58 रुपये झाले आहे. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

यंदा उशिरा पाऊस पडला. त्यामुळे चाऱ्याअभावी दुधाच्या उत्पादनात 10 टक्क्यांची घट झाली. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करावी लागली, असं कल्याणकाही दुध संघाने सांगितले आहे. शुक्रवारी पुण्यात पार पडलेल्या बैठकीस राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. (हेही वाचा - शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात; 3 जण जखमी)

सध्या राज्यात विविध दूध डेअरीवर गायी-म्हशीच्या दुधाचा दर एकसारखा नाही. त्यामुळे दुधाची विक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसतो. यासाठी राज्यातील गायी-म्हशीच्या दुधाचे दर ठरवण्यात आले असून त्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी गायीच्या दूधाचा दर प्रति लिटर 46 रुपये होता. आता त्यात वाढ करून 48 रुपये करण्यात आला आहे. तसेच म्हशीच्या दुधाचा दर 56 वरून 58 रुपये प्रति लिटर करण्यात आला असल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे.