शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला अपघात; 3 जण जखमी
संजय रायमुलकर (Photo Credit: FB)

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (ShivSena) आमदार संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar) यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. जानेफळ-मेहकर मार्गावर (Janephal-Mehkar) शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये संजय रायमुलकर यांच्यासह ३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मेहकर (Mehkar) येथील महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्ट रुग्णालयात (Mahatma Gandhi Memorial Trust Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हा अपघात ऐवढा भीषण होता की, यामध्ये संजय रायमुलकर यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे.

संजय रायमुलकर हे जानेफळ येथून मेहकरकडे त्यांच्या वाहनाने येत होते. त्यावेळी नायगाव भालेगाव रस्त्यावर समोरून रेतीने भरलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामुळे त्यांचे वाहन पटली झाले. या अपघातात संजय रायमुलकर यांच्यासह चालक पंजाब गुडघे, सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर निकस या तिघांना मुका मार लागल्याची माहिती समोर आली आहे. संजय रायमुलकर यांच्या छातीला मार लागला असून गुडघे आणि निकस यांनाही दुखापत झाली आहे, अशी माहिती निलेश गट्टानी यांनी दिली आहे. संजय रायमुलकर यांना यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी मेहकर येथील मल्टि हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. हे देखील वाचा-शाळा कोणत्याही माध्यमाची असो, मराठी शिकावच लागेल: अजित पवार

मेहकर विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा विजय मिळवणारे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. तसेच सतत तीन विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात मतदारसंघातून सर्वाधिक मते घेण्याची सुद्धा हॅट्रिक केली आहे.