Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय (Marathi Subject) सक्तीचा करण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawa) यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर आणि राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडून महाविकासआघाडी ( Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेवर आल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बारामती येथे आले होते. या वेळी बारामतीच्या जनतेने केलेल्या नागरी सत्काराच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणावेळी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. महाराष्ट्रात राहात असलेल्या प्रत्येक मुलाला मराठी लिहिता वाचता यायला हवे. त्यासाठी सर्व भाषामाध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्या येणार आहे. राज्य सरकार लवकरच त्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, या वेळी बोलताना अजित पवार यांनी चांगले काम करा निधी कमी पडू देणार नाही, असे अश्वासन बारामतीकरांना दिले. पण, आता माझ्या डोळ्यासमोर केवळ बारामतीच नव्हे तर, संपूर्ण राज्य आहे. त्यामुळे निधी देताना सर्वसमावेशकता डोळ्यासमोर ठेऊनच निर्णय घेणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत माझ्यावर राज्यातील इतर उमेदवारांचीही जबाबदारी असल्यामुळे प्रचारासाठी मला बारामतीत पुरेसा वेळ देऊन फिरता आले नाही. परंतू, पवार कुटुंबीयांवर प्रेम करणारी जनता, पक्षाचे कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास असलेल्या अनेक लोकांनी परिश्रम केले आणि मला लाखांच्या लीडने निवडूण दिले. त्यामुळे त्या सर्वांचा मी आभारी आहे, असेही अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, 7th Pay Commission: राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी 5 हप्त्यात मिळणार; 3 लाख 29 हजार 548 कर्मचाऱ्यांना होणार लाभ)

पवार कुटुंबीयांची अनुपस्थिती

दरम्यान, अजित पवार यांचा नागरी सत्कार होत असताना अजित पवार यांचे कुटुंबीय वगळता पवार कुटुंबीयांतील कोणीही उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडूण आल्यानंतर बारामतीत नागरी सत्कार होत असताना पवार कुटुंबीय उपस्थीत नसल्याने हा मुद्दा प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरला आहे.