प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसशी (Coroanvirus)  झुंज देताना पुणे येथील एका 58 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते,त्यांची प्रकृती बिघडत गेल्याने मागील 12 दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटर वर सुद्धा ठेवण्यात आले होते, मात्र अखेरीस आज त्यांनी प्राण सोडले आहेत. पुणे येथील भारती रुग्णालयात (Bharti Hospital, Pune) त्यांच्यावर उपचार सुरु होते, या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र ओसवाल यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, रुग्णाला जेव्हा हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले तेव्हा कोरोना सोडूनही त्यांना हायपर टेन्शन, अतिवजन अशा समस्या होत्या. यापूर्वी झालेल्या मृत्यूंमध्ये सुद्धा हायपरटेन्शन (Hypertension)  ही कॉमन समस्या दिसून आली होती. अन्य व्याधी आणि त्यातही अधिक वय असणाऱ्या असणाऱ्या रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागतो असे यातून स्पष्ट होते. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी जाणुन घ्या एका क्लिकवर..

कोरोना व्हायरसशी लढताना पोलीस हे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसोबत आघाडीवर राहून काम करत आहेत. अशावेळी यापूर्वी अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काहींवर अजूनही उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी वयवर्षे 50 ते 58 दरम्यानच्या हवालदार, वाहतूक पोलीस व ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी जाहीर केला होता. अधिक वय व अन्य आजार असणाऱ्या पोलिसांना याअंतर्गत लॉक डाऊन संपेपर्यंत भरपगारी सुट्टी घेता येणार आहे.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. सद्य घडीला राज्यात रुग्णांचा एकूण आकडा हा 12,974 वर पोहचला आहे. यापैकी 10, 311रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून अन्य 548 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तसेच, 2115 जणांनी कोरोनावर मात केली आहे.