कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल (DGP Subodh Kumar Jaiswal) यांनी जाहीर केला आहे. मागील दोन दिवसात मुंबई पोलिसांमधील (Mumbai Police) 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता याच पार्श्वभूमीवर वयवर्षे 55 च्या पुढील कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्याची परवानगी देण्यात आली होती. हा निर्णय सुरवातीला मुंबई पोलिसांपुरता मर्यादित घोषित करण्यात आला होता मात्र आता जयस्वाल यांनी हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला आहे. टाइम्सच्या माहितीनुसार पोलीस दलातील 50 ते 58 वयोगटातील कर्मचाऱ्यांना लॉक डाऊन संपेपर्यंत भर पगारी सुट्टी घेता येणार आहे. जर का या कर्मचाऱ्यांनी स्वतः कामावर येण्याची तयारी दाखवली तर त्यांना कार्यालयीन जबाबदारी सोपवण्यात यावी व त्यांच्या आरोग्याची तिथे नेट काळजी घेतली जावी अशा सूचना सुद्धा जयस्वाल यांनी केल्या आहेत. (हे ही वाचा- Coronavirus मुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला 'हा' मोठा निर्णय)
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव हा वयाने अधिक असणाऱ्यांवर दिसून येतो. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन अशा व्याधी असल्यास आणखीन धोका असतो अशावेळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातून त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचे आरोग्य रिपोर्ट्स घेतले होते, यानुसार 2 लाख पोलिसांमधील 12 हजार कर्मचारी हे 55 ते 58 वयोगटातील तर 25 हजार कर्मचारी हे 50 ते 55 गटातील असल्याचे समजले होते. महाराष्ट्रातील Coronavirus बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी व आजचे ताजे अपडेट पहा एका क्लिकवर
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांना सुरक्षा आणि स्वच्छता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेषतः वाहतूक विभागातील पोलिसांना रस्त्यावर फिरणाऱ्यांना कसे हाताळावे, त्यांना अटक करताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देण्यात आली आहे. सॅनिटायजर, मास्क, हॅन्ड ग्लोव्ह्ज, PPE किट्स यांचा मुबलक पुरवठा केला जात आहे. ठिकठिकाणी पोलिसांचे स्क्रिनिंग केले जात आहे. याबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालत आहोत असे जयस्वाल यांनी सांगितले.