दिलासादायक! मुंबईत उद्यापासून सर्व लसीकरण केंद्रे नियमित सुरु होणार, BMC ला दीड लाख लसींचा साठा प्राप्त- आयुक्त इक्बाल सिंह चहल
BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credit: Twitter)

मुंबईत कोविशिल्ड (COVIShield) लसीचा तुटवडा पडल्याने काही लसीकरण केंद्रावर लसीकरण थांबविण्यात आले होते. दरम्यान आज मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यानुसार, मुंबई महापालिकेला दीड लाख कोविशिल्ड लसींचा पुरवठा झाल्याने उद्यापासून मुंबईत सर्व लसीकरण केंद्रे (Vaccination Centres in Mumbai) सुरु राहणार आहेत अशी घोषणा करण्यात आली आहे. ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी असून यामुळे काही दिवस का होईना पण मुंबईतील लसीकरण सुरळीत सुरु राहील.

कोविड प्रतिबंध लसीच्या 1 लाख 58 हजार मात्रा बृहन्मुंबई महानगर पालिकेला आज प्राप्त झाल्या असून शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे उद्या सोमवार दिनांक 26 ते बुधवार दिनांक 28 एप्रिल 2021 असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे अशी माहिती मिळत आहे.हेदेखील वाचा- मुंबईसाठी दिलासादायक बातमी! केंद्र सरकारकडून BPCL परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी, देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांचे मानले आभार

दरम्यान, प्राप्त लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय सीमित असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे.

तसेच मुंबईसाठी आणखी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारकडून मुंबईत भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी (BPCL) परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी (Jumbo COVID Centre) परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहे.