COVID-19 Vaccination In Pune: पुणे मनपा हद्दीत आज कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम बंद; लसींचा तुटवडा
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला कोविड योद्धे नंतर वृद्ध आणि सहव्याधी असलेले नागरिक आणी आता अगदी 18 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लस देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. पण सध्या देशात लसींचा तुटवडा असल्याने हा लसीकरण कार्यक्रम रेंगाळत आहे. पुणे महानगर पालिका हद्दीमध्ये (PMC) आज 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण(COVID 19 Vaccination)  आज बंद राहणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार लसींचा तुटवडा असल्याने आज लसीकरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. तर तो जसा पुर्ववत होईल तसे पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. COVID 19 Vaccination Fresh Guidelines: कोविड वर मात केल्यानंतर 3 महिन्यांनी मिळणार लस, आता स्तनदा माता देखील घेऊ शकतात लस; केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाची नवी नियमावली.

दरम्यान 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण हे केंद्र सरकारकडून मोफत केले जात आहे. यामध्ये कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून नागरिकांना लस घ्यायची आहे. पण केंद्राकडून लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने आता पुण्यामध्ये हा लसीकरण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दुसर्‍या डोस साठी प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना या लस तुटवड्यामुळे त्रास होऊ नये म्हणून 18-44 च्या लोकांसाठी त्यांनी विकत घेतलेला साठा वळवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राज्यात तरूणांचे लसीकरण बंद आहे तर आता पुण्यात 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणालाही ब्रेक लागला आहे.

PMC Care  ट्वीट

भारतामध्ये सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक वी या तीन लसी उपलब्ध आहेत. नागरिकांना कोविन अ‍ॅप वर लसींनुसार देखील लसीकरण केंद्र शोधण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पुण्यात काल 931 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 1000 हून अधिक जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 15,043 जणांवर उपचार सुरू आहेत. तर पुणे मनपा हद्दीत एकूण 9,51,547 लाभार्थ्यांना कोविड19 चा लसीचा डोस देण्यात आला आहे.