राज्यात मागील काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या चिंता निर्माण करत आहे. कोविड-19 रुग्णवाढीमुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून अनेक सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. दरम्यान, रुग्णवाढीचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांवरही कोरोनामुळ संकट ओढावले, अशी भीती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहील्यास पुन्हा परीक्षांच्या वेळापत्रकात आणि पद्धतीत बदल करावा लागू शकतो. त्यामुळे वेळ आणि मनुष्यबळाची कमतरता यात हे लक्ष्य कसे गाठायचे हे मोठे आव्हान शिक्षण मंडळासमोर उभे राहणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास अभ्यासाचे गणित बिघडेलच. त्याचबरोबर संसर्गाचा धोकाही वाढेल. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे मध्ये होणार आहेत. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पार पडणार आहे. मात्र मागील काही दिवसांमधील रुग्णवाढ पुढे अशीच सुरु राहिल्यास परीक्षा घेणे अवघड होणार आहे.
मागील वर्षी कोरोना व्हायरस संकटामुळे शैक्षणिक वर्षावर मोठा परिणाम झाला. दहावी-बारावीचे निकालास विलंब झाला. तर शाळा-महाविद्यालये 10 महिने बंदी होती. मात्र ऑनलाईन वर्ग सुरु होते. आता टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. मात्र पुन्हा वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा बंद करण्यात आले आहेत. तर मुंबईतील महाविद्यालयं लगेचच सुरु होण्याची शक्यता कमी आहे.