Coronavirus in India (Photo Credits: IANS) Representational Image

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर पुण्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या 16 वर पोहचली असून महाराष्ट्रात एकूण संख्या 33 वर पोहचली आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोना व्हायरसच्या रुग्णावर किंवा त्यांच्या कुटुंबियावर बहिष्कार टाकल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी स्पष्ट केले आहे. कारण कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांसोबत दुजाभाव करण्यात येत असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

तर काही दिवसांपूर्वीच पुणेशहरात कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे रुग्ण सापडले होते त्यापैकी एक व्यक्ती हा सोलापूर येथील रहिवासी होता. या रहिवाशाच्या सोलापूर येथील कुटुंबीयांवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र आता कोरोना रुग्णांच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकल्यास कारवाई होणार आहे.(कोरोना व्हायरसचा सिनेसृष्टीला फटका, चित्रिकरण 19-31 मार्च पर्यंत रद्द)

 देशात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित 100 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून सरकारकडून खबरदारी घेण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण झाल्याची 30 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर सरकारने नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांना सुद्धा 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहिर केली आहे. ऐवढेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी जाळ्याचे टाळावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तर मुंबईतील राणीबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुण्यात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा बंद केल्यानंतर आता अंगणवाड्या सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे.