कोविड-19 मुळे झालेल्या सर्व मृत्यूंचे ऑडिट करण्याचा ठाणे महानगरपालिकेचा निर्णय
Coronavirus | Representational |(Photo Credits: IANS)

कोविड-19 (Covid-19) मुळे झालेल्या सर्व मृत्यूचे ऑडिट (Audit) करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोना संसर्गामुळे झालेल्या अनेक मृत्यूंबद्दल कुटुंबियांच्या मनात असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होईल. यासाठी एका समितीची स्थापना करणार आल्याचे आयुक्त विपीन शर्मा (Vipin Sharma) यांनी सांगितले. विशेष म्हणजे असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी ठाणे महानगरपालिका ही पहिलीच पालिका ठरणार आहे. एबीपी माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19 मुळे अनेक मृत्यूंबाबत नातेवाईकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. नेमका मृत्यू कोविडमुळे झाली की नाही, रुग्णावर काय उपचार करण्यात आले, ते योग्य होते की अयोग्य असे प्रश्न नागरिकांना पडले होते. ही बाब लक्षात घेत पालिका ह्द्दीतील सर्व कोविड मृत्यूचे ऑडिट करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के (Mayor Naresh Mashke) यांनी केली होती. त्यानंतर आयुक्त विपीन शर्मा यांनी सर्व मृत्यूचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय सिव्हिल सर्जन डॉ. कैलाश पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. मुरूडकर, डॉ. योगेश शर्मा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनाही या समितीमध्ये सदस्य म्हणून सहभागी करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी केवळ खाजगी रुग्णालयांच्या बिलाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात दोषी आढळलेल्या रुग्णालयांवर ठाणे महापालिकेकडून कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र आता खाजगी आणि सरकारी दोन्ही हॉस्पिटल्समधील मृत्यूंचे ऑडिट होणार आहे. (ठाणे: हॉस्पिटलचे पूर्ण बिल भरले नाही म्हणून मृत महिलेचे शव कुटूंबियास देण्यास नकार, सोशल मिडियावर बातमी व्हायरल झाल्यानंतर मृतदेह दिला ताब्यात)

कोविड-19 मुळे झालेला मृत्यू आणि त्यांच्यावर करण्यात आलेले उपचार या संदर्भात संशोधनकर्त्यांना माहिती मिळावी, म्हणून सर्व मृत्यूंचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखादा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीमुळे झाला असल्याचे ऑडिटदरम्यान निर्दशनास आले तर संबंधित डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

दरम्यान, ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या 2,24,823 वर पोहचली असून त्यापैकी 2,02,665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 16,913 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5,208 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.