Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत कोरोनाचे नवे 13 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2043 वर पोहचल्याची महापालिकेने दिली माहिती
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच दरम्यान, मुंबईतील धारावीत (Dharavi) आज कोरोनाच्या नव्याने 13 रुग्णांची भर पडली आहे. याबाबत मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे.धारावीत गेल्या काही दिवसांपासून नव्याने एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली नाही. तसेच येथील परिस्थिती हळूहळू बदलत चालल्याचे ही दिसून येत आहे.

धारावीत आतापर्यंत 2043 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या असून 77 जणांचा बळी गेल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. धारावीत दाटीवाटीने लोकवस्ती असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे शक्य नाही आहे. मात्र महापालिकेकडून या ठिकाणच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या एका पथकाने येथील स्थानिकांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी सुद्धा केली होती. कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीत कोविड19 चा डबलिंग रेट 42 दिवसांवर गेला आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी) 

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 3,427 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,568 वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तर चांगली माहिती अशी की 49346 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 51379 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.