Coronavirus Updates: गेल्या 48 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 129 कर्मचाऱ्यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह, संक्रमितांचा आकडा 3 हजारांच्या पार
Maharashtra Police | (File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमात शिथिलता आणल्यानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे वेगाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोविड वॉरिअर्स आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील नव्याने 129 जणांची गेल्या 48 तासात कोविड19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे एकूण संक्रमितांचा आकडा 3 हजारांच्या पार गेल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.(महाराष्ट्रात कोरोनाविरूद्ध Remdesivir ची क्लिनिकल ट्रायल सुरू; वाढत्या रूग्णसंंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय)

महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांच्या दलातील एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता पर्यंत जवळजवळ 3388 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच 36 जणांचा मृत्यू झाला असून 1945 जणांची प्रकृती सुधारली आहे. तर वयाच्या 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काम करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(मुंबई पोलिस दलातील 2028 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण; SRPF चे 82 जवान Covid-19 बाधित)

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमवला आहे. मात्र, राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.