मुंबई पोलिस दलातील 2028 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण; SRPF चे 82 जवान Covid-19 बाधित
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्र राज्याभोवती असलेला कोविड-19 (Covid-19) चा वेढा दिवसागणित अधिक मजबूत होत आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग होण्याचे सर्वाधिक धोका अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आहे. यात नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले पोलिस कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडलेले आहेत. दरम्यान मुंबई शहरात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे मुंबई पोलिसांवरील (Mumbai Police) ताण साहजिकच जास्त आहे. मुंबई पोलिस दलातील तब्बल 2028 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर SRPF च्या 82 जणांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या संकट काळात पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर यांसारख्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यापैकी मुंबईत तैनात करण्यात आलेल्या 82 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस बाधित पोलिस आणि SRPF च्या जवानांवर योग्य उपचार आणि उत्तम सुविधा मिळतील असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

ANI Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 97648 वर पोहचला असून 3590 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 47968 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 46078 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पोलिसांवरील ताण देखील वाढणार आहे. त्यातच अनलॉक 1 च्या माध्यमातून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने पोलिसांवरील सुरक्षेची जबाबदारी अधिकच तीव्र झाली आहे.