कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणीच्या नावाखाली तरुणीच्या गुप्तांगाचा (Genitals) स्वॅब घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा (Badnera) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता 24 वर्षांची आहे. बडनेरा पोलिसांनी (Badnera Police) घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपीला अटक केली व त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हाही नोंदवला. अल्पेश अशोक देशमुख (वय-30 वर्षे ) असे आरोपीचे नाव आहे. अल्पेश देशमुख हा बडनेरा येथील एका कंत्राटी लॅबमध्ये टेक्निशियन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) म्हणून काम पाहात होता.
प्राप्त माहितीनुसार, बडनेरा येथील एका बड्या व्यापारी प्रतिष्ठानमधल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच चाचणी करण्यात आली. पीडिता हिसुद्धा त्याच प्रतिष्ठानमध्ये कार्यरत होती. परिणामी पीडितेचीही चाचणी करण्यात आली.
दरम्यान, बडनेरा येथील प्रतिष्ठानमधले सुमारे 20 कर्मचारी हे बडनेरा येथीलच एका सरकारी रुग्णालयात चाचणीसाठी गेले. यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मोदी रुग्णालय असे या रुग्णालयाचे नाव आहे. हे रुग्णालय महानगरपालिकेचे आहे. या वेळी पीडितेच्या नाकातून स्वॅब घेतल्यानंतर या चाचणीसाठी गुप्तांगाचा स्वॅब घ्यावा लागतो असे कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाने पीडितेला सांगितले. तसेच, तिच्या गुप्तांगाचा स्वॅबही घेतला. (हेही वाचा, Satara: कोरोना व्हायरस क्वारंटाइन सेंटरमधील धक्कादायक प्रकार; जेवणात सापडली अळी (See Photo))
महत्त्वाचे असे की कोविड चाचणीसाठी कोणत्याही ठिकाणी गुप्तांगाचा स्वॅब घेतला जात नाही. केवळ नाक आणि घसा अशा दोनच ठिकाणचे स्वॅब घेऊन चाचणी केली जाते. पीडितेला घडल्या प्रकारात आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यामुळे तिने आपल्या भावाला याबाबबत कल्पना दिली. पीडितेच्या भावाने डॉक्टरांकडे विचारणा केली असता कोविड चाचणीत कोणत्याही प्रकारे गुप्तांगाचा स्वॅब घेतला जात नसल्याचे समजले. त्यानंतर पीडित तरुणीने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रयोगशाळा तंत्रज्ञाविरुध्द बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल नोंदवला. तसेच, तातडीने कारवाई करत आरोपी अल्पेश देशमुख याला अटक केली. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पीडितेसोबत घडलेल्या घटनेचा तीव्र निशेध केला आहे. तसेच, महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. आरोपीस कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.