जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने देशात प्रवेश केला आणि देशासह महाराष्ट्र राज्यालाही विळखा दिला. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 52 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरात 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने, ऑफिसेस बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी घेतला आहे. मात्र मुंबईच्या लाईफलाईन्स लोकल, बस सेवा सुरु राहणार आहेत. यापूर्वी कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी शाळा, कॉलेजस, स्विमिंग पूल, जीम, थिएटर्स बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नक्की कोणत्या सेवा सुरु राहणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. (मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर मध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी कंपन्या 31 मार्च पर्यंत राहणार बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
त्यातच व्हॉट्सअॅपवर 'Complete Lockdown' अशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी यांच्यातील चर्चा ऐकू येत आहे. त्यात देशात complete lockdown करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र ही क्लिप फेक असून अफवा पसरवणाऱ्यांचे हे काम आहे. त्यामुळे ही क्लिप फॉरवर्ड करु नका, असे सांगण्यात येत आहे.
देशातील चिंताजनक परिस्थिती आणि अफवांचे पेव यामुळे नागरिक गोंधळात पडले आहे. मात्र पॅनिक न होता जाणून घ्या कोणत्या सेवा सुरु आणि बंद राहणार?
काय सुरु राहणार?
जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा
किराणा माल, दूध, औषध या जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सातत्याने होत राहील. किराणा मालाची दुकानं, दूधाची दुकानं, मेडिकल स्टोर्स सुरु राहणार आहेत.
बस-रेल्वे सेवा
बस रेल्वे सेवा या तुर्तास बंद करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लांब पल्लाच्या रेल्वे रद्द झाल्या असतील तरी लोकल ट्रेन्स आणि बसेस नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत.
बँका
बँकेचे व्यवहार स्थगित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बँका सुरु राहणार आहेत. मात्र बँकांमध्ये गर्दी न करता ऑनलाईन सुविधांचा लाभ घेण्याच आवाहन बँकांकडून करण्यात येत आहे.
काय असेल बंद?
मॉल्स, थिएटर्स, जीम, स्विमिंग पूल्स यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. तर बगिचे, उद्याने, मंदीरेही बंद असतील. शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली असून इयत्ता 1 ते 8 वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
इतर ऑफिसेस, वर्कशॉप्स, दुकानं
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर ऑफिसेस, वर्कशॉप्स, दुकानं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांसाठी तो लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक ऑफिसेसमध्ये 'वर्क फ्रॉर्म होम'ची मुभा देण्यात आली आहे. तसंच सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50% हून 25% इतकी करण्यात आली आहे.
रेस्टॉरन्ट्स, पब्स, बार
राज्यातील रेस्टॉरन्ट्स, पब्स, बार 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च, रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले आहे. जनतेने जनतेसाठी पाळण्याच्या या कर्फ्यू काळात सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत घराबाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे.