Coronavirus: महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाकडून लॉकडाउनच्या काळात 2.82 कोटी रुपयांची दारु जप्त तर 472 जणांना अटक
Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून तो आता 537 वर येऊन पोहचला आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे नागरिकांनी आता तरी घराबाहेर पडणे बंद करावे अशा सुचना दिल्या जात आहेत. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार पूर्णपणे बंद ठेवण्यात यावेत असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. यामुळे तळीरामांची दारुची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी राज्यातील विविध ठिकाणी दारुची दुकाने तळीरामांनी फोडून दारू पळवल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच पार्श्वभुमीवर लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र उत्पादन शुल्काकडून एक मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांनी 2.82 कोटी रुपयांची दारु जप्त केली आहे. तसेच 472 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. तरीही नागरिक विनाकारण काही ना काही कारण सांगत घराबाहेर पडत आहे. त्यामुळे आता पोलिसांना अशा बेजबाबदार आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई करत आहेत. मात्र दारुड्यांची लॉकडाउनच्या काळात गैरसोय झाली असून चोरीछुप्या रितीने त्याची विक्री करण्यात येत आहे. तर महाराष्ट्र उत्पादन शुल्काने 2.82 कोटी रुपयांची दारु जप्त केली असून 1221 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 472 जणांना अटक करण्यात आली असून अवैध पद्धतीने दारु बाळगल्याप्रकरणी 36 गाड्या सुद्धा जप्त केल्या आहेत. याबाबत कांतीलाल उपम, महाराष्ट्र उत्पादन आयुक्त यांनी माहिती दिली आहे.(Coronavirus Lock Down: लॉक डाऊन लक्षात घेता सरकारने तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे - रामदास आठवले)

दरम्यान, महाराष्ट्रात खरोखरच आता संकटाचा काळ आहे देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. अशावेळी नागरिकांना वारंवार घरी राहून लॉक डाऊनचे पालन करण्यास सांगितले जात आहे. जर का 15 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो असे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.